अहंकार, मुजोरी वाढल्याने भाजपचा पराभव

Foto

औरंगाबाद- लोकसभेची निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. त्यापूर्वी पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. या निवडणूक निकालात पाच पैकी तीन महत्त्वाच्या राज्यातील भारतीय जनता पार्टीची सत्ता मतदारांनी उलथवून लावली. निवडणूक निकाल पाहता सत्ताधारी केंद्र सरकारला एक प्रकारे धोक्याची घंटा आहे, असे बोलले जात आहे. पण या पराभवाची कारणमिमांसा पाहिली असता गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्‍यांमध्ये आलेला अहंकार आणि वाढती मुजोरी यामुळेच भाजपचा पराभव झाला.

 

स्वातंत्र्यानंतर केंद्रात सर्वाधिक काळ देशाची सत्ता ही काँग्रेस पक्षाच्या हातात राहिली. आणीबाणीनंतरचे काही वर्ष मोरारजी देसाई, चंद्रशेखर व्ही. पी. सिंग, इंदकुमार गुजराल, देवेगौडा व त्यानंतर भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारे  वगळता काँग्रेसचेच पंतप्रधान सर्वाधिक काळ राहिले. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली. त्यामुळे देशातील जनतेने भाजपला विजयी केले. २०१४ मध्ये देशातील जनतेने काँग्रेसला नाकारत भाजपला कौल दिला. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले. मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला शेतकरी, बेरोजगार, युवक यांना तसेच प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्यात येतील, अशी आश्‍वासने दिली. परंतु सत्तेत आल्यानंतर सर्व आश्‍वासनांचा विसर पडला.

 

केंद्रात सत्तेत सरकार येवून साडेचार वर्षे उलटली. पण या काळात मोदींनी काही निर्णय चांगले घेतले असले तरी नोटाबंदी, जी.एस.टी. सारख्या निर्णयाने अडचणी वाढल्या. शेतकर्‍यांच्या हमीभावाचा कागदावरच निर्णय घेतला. दरवर्षी दोन कोटी रोजगाराची घोषणा हवेतच विरली. जनतेचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी गौसंरक्षणाच्या नावाखाली केल्या जाणार्‍या हत्या, जाती जातीत तेढ निर्माण केली जाणारी भाजप नेत्यांची वादग्रस्त वक्‍तव्ये, विरोधी पक्षातील नेत्यांचा आदर न राखता त्यांच्या बाबतीत अभद्र भाषेचा वापर करणे भाजप नेत्यांच्या वाढत्या मुजोरीला जनता कंटाळला होती. हा सर्व प्रक्षोभ राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड मिझोराम व तेलंगणातील झालेल्या निवडणुकीतून समोर आला आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजपची सत्ता होती. भाजपचे हे गड तेथील जनतेने उद्धवस्त केले. यामागचे कारण काय यावर आता भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 

 

पदाला न शोभणारी भाषा 

 

भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपच्या नेत्यांची बदललेली भाषा आणि मगरुरी अशोभणीय आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या जाहीर सभांमध्ये विरोधी पक्षातील नेत्याविषयी केलेली वादग्रस्त वक्‍तव्ये ही पंतप्रधानपदाला न शोभणारी होती. राजकारणात एकमेकांवर टिका टिपणी केली जात असली तरी पंतप्रधानासारख्या व्यक्‍तीने खालच्या पातळीवर टीका करणे, देशातील जनतेला मान्य नाही. त्यामुळे या पुढे तरी झालेल्या पराभवातून धडा घेऊन आपला अहंकार बाजूला ठेवून मुजोरी बंद करतील, अशी अपेक्षा जनतेला आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker